महाराष्ट्रातल्या गावांगावांत पाण्यासाठी सुरू असलेली वणवण विविध माध्यमांतून बघितली की,
यंदाच्या दुष्काळाची तीव्रता ध्यानी येतेय. पाऊस लांबला, कमी
झाला यामुळे येणारं हे अवर्षण नव्हे. गेल्या कित्येक वर्षात शासकीय आणि वैयक्तिक
पातळीवर दुर्लक्षित राहिलेला जलसंवर्धनाचा मुद्दा यावर्षीच्या दुष्काळाने अधोरेखीत केलाय. मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीच जंगजंग पछाडावं
लागतंय तिथे शेतीची काय कथा? शहरातल्या लोकांना मात्र
दुष्काळाची थेट झळ पोचत नसल्याने या समस्येची तितकीशी जाणीव दिसत नाहीय. एकीकडे
गावांत अशी बिकट अवस्था आहे तरीही शहरात आपल्या आसपास कपडे,
भांडी, जनावरं, गाड्या, इमारतींच्या काचा धुण्यासाठी भरमसाठ पाणी नासणाऱ्यांची संख्याही काही कमी
नाही. जलसंवर्धनासंबंधी अनभिज्ञता, पाण्याच्या मूल्याची
जाणीव नसणं यातून हे घडतं. आपल्याकडे एकूण ‘जलसाक्षरता’च कमी आहे. दुष्काळाचा असा प्रश्न किंवा पाण्याचं दुर्भिक्ष काही फक्त
आपल्या प्रांतात नाही. जगात असेही काही देश आहेत, ज्यांना
पाण्याची टंचाई कायम जाणवत असते. मूळातच ते प्रांत पाण्याच्या दुर्भिक्षाचे. तरीही
पाण्याच्या मूल्याची जाणीव असल्याने सामान्य माणूस पाण्याचा सुयोग्य वापर करत असतो. पाण्याविनाही हे देश प्रगती करत आहेत.
मुबलक पाणी नसूनही प्रगतीचा मार्ग शोधणारी राष्ट्रं मिड्ल
ईस्ट अर्थात मध्य-पूर्वेत सापडतात. प्यायचं पाणीही विकत घ्यावं लागत असल्याने
तिथली जनता पाण्याचं मोल जाणते आणि त्याप्रमाणेच वागते. वर्षभरातून एखाद- दोन वेळा
झाला तर पाऊस पडतो या परिस्थितीची आपण कल्पना तरी करू शकू का? पण
त्यामुळेच तिथे पाण्याचा अपव्यय टाळला जातो आणि पाण्याचा कमीत कमी वापर करावा
लागेल असं तंत्रज्ञान विकसित करण्याकडे कल असतो. यासंदर्भात नुकतीच तिथल्या
माध्यमातून आलेली एक बातमी लक्षवेधी ठरली. पाण्याशिवाय गाडी धुण्याचं सोपं तंत्र
दुबईतील एका उद्योजकाने शोधून काढलंय. हा उद्योजक मूळचा भारतीय आहे हे विशेष.
ऋषी आणि सानुज कोहली या तरुण उद्योजक बंधूंनी ‘वॉटरवाईज’ नावाने हा नवा उद्योग सुरू केलाय. फक्त एका स्प्रेच्या स्वरूपात येणारं
द्राव आणि एक कापड यांचा वापर करून गाडी स्वच्छ करता येते. पाण्याचा थेंबही न
वापरता गाडी स्वच्छ होते आणि वर पॉलिश केल्यासारखी चकाकीही आणली जाते. पाण्याचं
दुर्भिक्ष असल्याने या प्रकारच्या उद्योगांना तिथलं सरकारही पाठिंबा देतं.
सुरवातीला केवळ हा स्प्रे तयार करून तो कारवॉशिंग
कंपन्यांना विकायला कोहली बंधूंनी सुरवात केली होती. पण नंतर ग्राहकांना थेट सेवा
देऊनच याचा प्रसार करण्याचा निर्णय घेऊन कारवॉश कंपनी सुरू केली. हा स्प्रे गाडीवर
मारून तो मायक्रोफायबर कापडाने पुसल्यानंतर गाडी धुतल्यासारखी स्वच्छ होते, असा
कंपनीचा दावा आहे.
कोहली बंधू फक्त कारवॉशच्या व्यवसायावर थांबले नाहीयतं.
स्वतःला इको आंत्रप्रेन्यर्स म्हणवून घेत ते आता इतर सफाईची कामं पाण्याशिवाय कशी
करता येतील, याचं तंत्र विकसित करत आहेत. मोठमोठ्या उंच इमारतींची काचेची
तावदानं धुण्यासाठी पाण्याचा एक थेंबही लागणार नाही, असं एक तंत्र
ते सध्या विकसित करत आहेत. दुबईतल्या गगनचुंबी इमारतींच्या काचा आधुनिक
तंत्रानुसार धुण्याचं पेटंट घ्यायचाही त्यांचा विचार आहे.
कोहली बंधूंनी त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय
पुढे नेण्याबरोबरच हे वॉटरलेस वॉशचं नवं तंत्रज्ञान विकसित केलं आणि बघता बघता
वॉटरवाईजचं चांगलंच बस्तान बसलं. सध्या दुबईतल्या कार वॉश मार्केटपैकी ४० टक्के
मार्केट वॉटरवाईजने काबीज केलंय, असं एक बातमी सांगते. केवळ पाच
कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन सुरू केलेली कंपनी आज बरीच मोठी झालीय.
आपल्या देशातही अशा काही नव्या तंत्रांची
गरज आहे. पण गोड्या पाण्याचा साठा अमर्याद नाही, याची जाणीवजागृती करणं हे
त्याआधीचं काम. कारण त्यातूनच असे नवे प्रयोग स्फूरू शकतील. चिरंतन विकासाच्या
दृष्टीने आधी जलसाक्षरता ही महत्त्वाची पायरी आहे.
No comments:
Post a Comment