आपल्या देशाचा अभिमान असणे आवश्यकच आहे. मराठी माणसाला तर भारतीय असण्याचा त्यातून मराठी असण्याचा, नुसता नाही तर जाज्वल्य अभिमान असतो. ‘आपल्या भारत देशाने एकविसाव्या शतकात खूप प्रगती केली आहे आणि आता आपण विकासाची नवी शिखरे गाठणार आहोत. आपला भारत देश जगात समर्थ राष्ट्र होणार आहे.....’ कोणत्याही व्यासपीठावरून (शाळेचे स्नेहसंमेलन, जाहीर सभा, कोपरा सभा, मेळावा, शिबिर, सत्कार समारंभ, निरोप संमारंभ, पुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलन,आणखी कसले संमेलन, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, गेला बाजार.. हास्य क्लबातसुद्धा) नेहमी ऐकू येणारे हे वाक्य. या कंसातील सगळ्या सोहळ्यांमध्ये शाल- श्रीफळाइतकेच महत्त्व भारताचा विकास आणि त्याबद्दलच्या अभिमानाला आहे. नाही... यात गैर काहीच नाही. मलाही माझ्या देशाचा अभिमान आहे. विशेषतः देशाबाहेर फिरताना तर भारतीयत्त्व प्रकर्षाने जाणवते. आपली ओळख प्रथम एक भारतीय म्हणून करून देतो आपण. परदेशात फिरताना नुसत्याच ‘एशियन’ ऐवजी ‘भारतीय’ म्हणून ओळखले गेलो तर उरात अभिमानच असतो फक्त. पण आपलेच देशबांधव कधी कधी असे वागतात की कुठे बघू असे होते. असे काही प्रसंग वाट्याला येतात की कधीकधी 'मी नाही त्या गावची' असे म्हणण्यात आनंद वाटतो. आपला महान देश, त्याची महान परंपरा यांच्याशी पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करते. (तशी प्रतिज्ञाच घेतली होती ना आपण सर्वांनी.) पण पर्यटनानिमित्त बाहेर फिरताना काही देशबांधव पाहिले की ते मात्र ही प्रतिज्ञा विसरलेले दिसतात. सौजन्याने वागण्याची प्रतिज्ञेतील साधी अपेक्षाही देशबांधव कधी कधी पूर्ण करत नाही. आपल्या देशाबद्दल मग बाहेरील जगात गैरसमज पसरत जातात किंवा आधीच पसरलेल्या गैरसमजांना आणखी खतपणी मिळत जाते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे; पण...! हा ‘पण’ समजावून सांगण्यासाठी मी नुकतेच अनुभवलेले तीन प्रसंग सांगते. तीनही प्रसंग परदेशात अनुभवायला आलेले. (चरितार्थ चालवण्यासाठी अस्मादिकांचा मुक्काम हल्ली इंग्लंडच्या परदेशात असतो हे आधी नमूद करते.)
प्रसंग १
स्थळ – स्कॉटलंड
काळ – ब्रिटनमधील लाँग वीकएंड
निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण बघायला, ऐतिहासिक शहरे बघायला स्कॉटलंडला येणे झाल्यामुळे आमची स्वारी खुशीत होती. एडिंबरा शहर बघितले. स्कॉटिश तैनातीमधला भुईकोट किल्लाही (कॅसल) बघितला. तिथेच एडिंबरामधील भुईकोटाच्या दारात मराठी आवाज ऐकू आला. ‘ए चला लवकर... भेळेचे पुडे नंतर उघडा आधी आत या.’ अस्मादिकांना अधिक आनंद जाहला. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी आवाज कसा घुमतोय, हे प्रत्यक्ष ऐकू आले. आणखी एका हॉटेलमध्ये पुन्हा एक मराठी कुटुंब ‘ऐकले’. या वेळी जाऊन ओळखही काढली. हल्ली किती ठिकाणी कसे भारतीय लोक भेटतात, याचे किस्से एकमेकांना ऐकवत निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्कॉटिश हायलंडची सफर करण्यासाठी एक टूर आरक्षित केली होती. वेळेत पोचण्यासाठी टूरची बस निघण्याची जागा आधीच शोधून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी हसतमुख आणि उत्साही स्कॉटिश गाईड लाभला आणि प्रवासाला सुरवात झाली. बसमध्ये बघतो तर काय २५ पैकी ८ -१० तरी चेहरे भारतीय वाटत होते. आनंद झाला. पुन्हा एकदा अभिमानाने ऊर भरून आला. उरलेले पर्यटक ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया अशा विविध देशांतून आले होते. टूर गाईडने ओळख करून देतानाच वेळेचे महत्त्व सांगितले आणि वर खास सूचना नमूद केली. काही देशांतील लोकांना वेळेचे फार महत्त्व नसते, तर अशांसाठी टूर थांबणार नाही. त्याच्या बोलण्याचा रोख ‘आपल्या’ लोकांकडे कसा होता, याची मराठीत आपापसात चर्चा झडली. एकूणच भारतीयांना कसे उगीचच कमी लेखतात, आपली प्रगती त्यांना सहन होत नाही, जळतात... वगैरे निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो. त्या स्कॉटिश गाईडकडे एक तीव्र कटाक्ष टाकून गप्प बसलो.
पहिला फोटो स्टॉप झोकात पार पडला. दुसऱ्या स्थळी हवाई पाळण्यातून (याला सोप्या मराठीत केबल कार किंवा गंडोला म्हणत असावेत) डोंगरावर चढण्याचा प्रसंग आला. पुन्हा एकदा कसे वेळेत खाली येणे गरजेचे आहे, नाहीतर पुढचा कॅसल बघण्याची वेळ निघून जाईल वगैरे आमच्या स्कॉटिश गाईडने सांगितले. सगळे निसर्गदर्शन करून आम्ही वेळेत बसपाशी आलो. तेव्हा अर्धी बस रिकामी होती. पाच मिनिटांत उरलेले सहप्रवासी आले. तरी बसमधील प्रवासी संख्या चारने कमी होती. १० मिनिटे झाली... हे ४ जण अजून गायब होते. १५ मिनिटे, २० मिनिटे, २५ मिनिटे झाली तशी सर्वांची सहनशक्ती संपत आली. स्कॉटिश गाईडचे वेळेचे महत्त्व यावरील भाषण एकीकडे सुरूच. दिलेल्या वेळेपेक्षा तब्बल अर्ध्या तासाने हसत- खिदळत चौकडी बसकडे येताना दिसली. आम्ही खिडकीतून पाहतो तो काय… ते तर एतद्देशीय बांधव निघाले. बसजवळ येताच आपणच उशीरा आलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे. कारण चेहऱ्यावरील भाव चटकन बदलले. ते आत येण्याआधी खाली उतरून आमच्या स्कॉटिश गाईडने त्यांना काहीतरी सुनावले असणार. बस सुरू करण्यापूर्वी त्याने एक तीव्र कटाक्ष आमच्यावरही टाकल्याचा भास झाला. काहीच चूक नसताना आमची मान अपराधी असल्यासारखी खाली गेली आणि तो नव्या जोमाने इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये कसे वेळेचे महत्त्व पाळले जाते हे सांगू लागला. यापुढे बस कोणासाठीही थांबणार नाही… हेदेखील त्याने पुन्हा सांगितले. तीन दिवसांच्या या प्रवासात असा अनुभव आणखी एकदा आला हे विशेष. या वेळी अर्धा तासाऐवजी १० मिनिटे थांबावे लागले आणि लेट लतीफ पुन्हा दुसरे एक ‘आपले’ भारतीय जोडपे.
***
प्रसंग २
स्थळ – हायडेलबर्ग, जर्मनी
काळ – दुसरा एक लाँग वीकएंड
ब्रिटनमुक्कामी असेपर्यंत देशाटन करून घ्यावे आणि थोडे आणखी शहाणपण मिळवावे असे वाटत असल्याने शक्य तेवढा आणि झेपेल तेवढा प्रवास करण्याचे ठरविले होते. त्यातून केल्याने (पर)देशाटन येते (जास्त) शहाणपण असा आम्हीच अर्थविस्तार केला. प्रथम जर्मनीकडे प्रस्थान ठेवले. गेल्या वेळी स्कॉटिश गाईडने केलेला भारतीय बांधवांचा उद्धार लक्षात ठेवून या वेळी लंडनस्थित अस्सल भारतीय पर्यटन कंपनीची टूर निवडली होती. तर अशा प्रकारे एतद्देशीय बांधवांच्या साथीत पहिलाच मुक्काम जर्मनीतील हायडेलबर्ग नामे शहरात घडला.
मुक्कामाचे हॉटेल सुंदर होते. परकीयांच्या दर्जापरीक्षणानुसार म्हणे तीन तारांकितही होते. खोल्या स्वच्छ आणि आवश्यक गोष्टींनी सजवल्या होत्या. आमच्या भारतीय मनोवृत्तीनुसार हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वप्रथम लक्षात घेतले जाते स्वच्छतागृह. त्यातील स्वच्छता बघूनच आम्ही हॉटेलचा दर्जा ठरवतो. तर त्याप्रमाणे आम्ही या तीन तारांकित हॉटेलचे स्वच्छतागृह तपासून पाहिले. दारातच आमच्यासाठी एक पत्रक आढळले. त्यावर स्वच्छतागृहाच्या वापराविषयी माहिती होती. हॉटेल व्यवस्थापकाच्या सहीने असलेली तळटीप मात्र लक्षवेधक होती. ‘भारतीय ग्राहकांसाठी’ असे ठळक अक्षरात लिहून परकीय पद्धतीचे शौचालय भारतीय लोक कसे अयोग्य रितीने वापरून खराब करतात हे उद्धृत करून वर ते आपण कसे वापरायला पाहिजे याचा खुलासा लिहीला होता. आता जगभर फिरणाऱ्या आमच्या भारतीय बांधवांना काय शौचालय वापरता येत नसेल का, असा विचार आला. वर फक्त भारतीय ग्राहकांसाठी असे लिहून आमच्या मूळ स्वच्छता सवयींवरच अविश्वास दाखवला गेला होता. स्वाभिमानी भारतीय मन त्यामुळे दुखावले गेले. खोलीत अर्थातच कसे अजूनही भारतीयांना कमी लेखतात, खरे तर युरोपीय पर्यटनस्थळांवर आजकाल चीनी लोकांखालोखाल भारतीयांचीच गर्दी असते, जग फिरण्याची आमची क्षमता आहे आणि धमकही आहे वगैरे चर्चा रंगली. थोड्या वेळाने जेवायच्या टेबलावरदेखील याविषयी आजूबाजूच्या टेबलवरून चर्चा ऐकली. शेवटी लंडनस्थित अस्सल भारतीय कंपनीच्या व्यवस्थापकापुढे आमच्या मनातील खेद सामूहिकरित्या व्यक्त करण्यात आला. भारतीयांच्या स्वच्छतेविषयीच्या सवयींवर आक्षेप व्यक्त करणाऱ्या आणि परिणामी भारतीयांना कमी लेखणाऱ्या हॉटेलमध्ये आमची सोय एका भारतीय कंपनीनेच का करावी, असा सवालही उपस्थित झाला. या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त झाला. त्यावर त्या लंडनस्थित भारतीय कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली पण ‘हे पत्रक इथे उतरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयीचा अनुभव लक्षात घेऊनच लिहिले गेले आहे. आपल्यापैकी काही लोकच याला जबाबदार आहेत’, अशी मल्लीनाथीही वर केली. जी आमच्यासह कित्येकांस रुचली नाही.
पुढील दोनच दिवसात लंडनस्थित अस्सल भारतीय कंपनीचा व्यवस्थापक खोटे बोलत नव्हता हे सिद्ध झाले. स्वित्झर्लंड मुक्कामी तेथील हॉटेलमधील एका खोलीतील स्वच्छतागृह तुंबल्याची आणि ते आपल्या’पैकीच एकाने अयोग्य तऱ्हेने वापरल्याची खबर आली. बातमी ऐकताना पुन्हा एकदा स्वित्झर्लंडच्या अनुभवासारखीच आमची कोणतीही चूक नसताना आमचीच मान शरमेने खाली झाली.
या प्रवासात एकदा नाही तर अनेक वेळा हा मान खाली जाण्याचा प्रसंग आमच्यावर गुदरला. स्वित्झर्लंडमधील माउंट टिटलीस या आल्प्स पर्वतराजीतील एका शिखरावर आम्ही चढलो होतो. चढलो म्हणजे हवाई पाळण्यातून गेलो आणि शिखरावर उतरलो. तिथल्या हिमाच्छादित सौंदर्याने भारावून गेलो. आपल्या (पुन्हा आपल्या) हिमालयावर देखील अशी कितीतरी सौंदर्यस्थळे आहेत. तिथे अशी पर्यटन स्थळे विकसित करता येतील, ती का बरे होत नसावीत, किंबहुना हिमालयाचे सौंदर्य काकणभर जास्तच असेल,ते कदाचित थोडे रौद्र भासेल वगैरे सखोल चर्चा त्या टिटलीस पर्वतशिखरावरच्या गोठवणाऱ्या थंडीत उभे राहून केली. छायाचित्रांचा कार्यक्रम उरकला आणि बर्फात साकारलेले मानवनिर्मत सौंदर्य निरखण्यासाठी 'आईसकेव्ह'चा रस्ता धरला. बर्फाच्या गुहेत बर्फातूनच साकारलेले विविध आकार, बर्फाच्या वस्तू न्याहाळत होतो. तेवढ्यात त्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या लादीवर उठून दिसेल अशी लालेलाल खूण नजरेस आली. पान अगर तंबाखू (गुटखा, मावा, जर्दा की आणखी काही) खावून थुंकलेली ती रंगीत पिचकारी पाहिली आणि शरमेने मान खाली जाण्याआधी मस्तकात तिडीक गेली. आमच्या आधी तिथे एक मोठा भारतीय गट येऊन गेला होता आणि हे रंगकाम त्यांच्यापैकीच कोणाचे तरी असणार हे तिथल्या बर्फाइतकेच पारदर्शी होते.
आणखी एकदा स्वित्झर्लंडमधीलच एका रेल्वे प्रवासात खिडकीतून एक पाण्याची रिकामी बाटली आणि प्लॅस्टिकचे पुडे भिरकावलेले पाहिले. भिरकवणाऱ्या हातांचा नजरेने शोध घेतला तेव्हा सोन्याच्या बांगड्या घातलेला पाचवारी साडीतील हात दिसला. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
***
प्रसंग ३
स्थळ – पॅरिस, फ्रान्स
काळ – तिसरा आणि उन्हाळ्यातील शेवटचा लाँग वीकएंड
कला, संस्कृती, सौंदर्य अशी नजाकतीने भरलेली फ्रान्सची राजधानी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. दिवस तसा छान उन्हाळी असल्यामुळे पॅरिस गजबजलेले होते. कदाचित जोडून सुटी आल्यामुळे जिथे –तिथे माणसांचे जथ्थे दिसत होती. पर्यटकांसाठी पंढरी असलेल्या पॅरिसमध्ये नेहमीच अशी गर्दी असते म्हणे, आमच्याबरोबरच्या जाणकारांनी माहिती पुरवली. पॅरिसनगरीच्या शिरपेचातील तुरा शोभणाऱ्या आयफेल टॉवरला भेट देण्यास उत्सुक होतो. तिथे गेल्यावर समजले की या टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर घेऊन झाणारा एकच विजेचा पाळणा (सोप्या मराठीत लिफ्ट) सुरू आहे. इतर तीन पाळणे बंद असल्यामुळे वर जाण्यासाठी उत्साही पर्यटकांची ही लांब रांग लागली होती. किमान ३ तास उभे राहावे लागणार, असे पुन्हा जाणकारांनी सांगितले. पण इलाज नव्हता. पॅरिसनगरीचे सौंदर्य त्या जागतिक आश्चर्य मानल्या गेलेल्या टॉवरवरून बघण्याची ओढ लागली होती. हळूहळू सरकणाऱ्या रांगेत धीर न सोडता वाट बघत होतो. बरोबरचे काही आपले भारतीय बांधव फारच अधिर झाल्याचे जाणवले. मुले-बाळे बरोबर असणाऱ्यांचे तिथेच खाऊच्या पुड्या सोडणे सुरू झाले. मग खाऊन-पिऊन तृप्त झाल्यावर याच मुलांचा रांगेतून पुढे – मागे खेळ सुरू झाला. मुलांपेक्षाही अधिर असलेल्या त्यांच्या पालकांनी मग शक्कल लढवली. ‘अरे बेटा किधर जा रहे हो’, असा नारा देत मुलांना दिले रांगेत सोडून. बच्चे कंपनी (खेळता खेळता) पुढे गेली आणि मागून त्यांचे चाणाक्ष पालक ‘बच्चे है’ असे म्हणत हसत हसत चक्क पुढे जाऊन उभे राहिले. या प्रकाराला सभ्य मराठीत घुसखोरी म्हणत असावेत. रांगेतील इतर पर्यटकांनी या प्रकाराबाबरत नापसंती व्यक्त केली. पण आपण त्या घुसखोरीच्या गावचेच नसल्याचा आव त्या अधिर पालकांच्या चेहऱ्यावर होता. उलट आपल्या अक्कलहुशारीमुळे आणि आपल्या लाडक्या मुलांच्या कर्तृत्त्वाने आपण कसा एक तास वाचवला याचेच तोंडभर सुख तिथे होते. आपल्यासारखे भारतीय प्रवासी रांगेतून थोडे जरी इकडे तिकडे करू लागले की गोऱ्या कपाळांवर चटकन आठ्या का पडतात, याचा उलगडा आत्ता झाला.
फ्रान्समधील गर्दीच्या आणखी एक- दोन पर्यटनस्थळांवर असेच अनुभव आले. बसमधून उतरल्यावर आपणच कसे आधी पोचणे आवश्यक आहे, अशा भावनेत आपले बांधव अक्षरशः पळताना पाहिले. ‘रांगेची शिस्त सर्वांना’ ही पाटी फक्त सगळीकडे लिहीलेली असते. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, या थाटात आपल्या देशात आपण वावरतो. इथेही तीच भावना दिसली. छायाचित्र काढतानादेखील भारतीय अधीरता दिसत होती. भरभर पुढे जाऊन मोक्याच्या ठिकाणी उभे राहायचे आणि दुसऱ्यांच्या छायाचित्रांतही आपली छबी कशी येईल, याची दखल घेण्याचे उद्योग सुरू होते. बसमध्ये गाईड काही माहिती देत असेल, टूरमध्ये काही महत्त्वाच्या सूचना सुरू असतील तेव्हाच आपल्या भाचेमंडळींना (बांधवांचा बालचमू) कसे रडावेसे, ओरडावेसे वाटते आणि त्यांनी शांत राहावे असे त्यांच्या पालकांनाच कसे वाटत नसते हेही वारंवार अनुभवले. भारतीय पर्यटकांची बस येताना दिसली की बाकीचे पर्यटक तिथून काढता पाय घेत असावेत, असे जाणवले. ‘मी नाही हो त्या गावची’ हे तिथे म्हणावेसे वाटले. शरमेने मान खाली जाणे, मस्तकात तिडीक जाणे यानंतरची ती पायरी होती. सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे म्हणताना आता नेहमी या‘बंधू-भगिनींची’ आठवण झाली.
***
तर अशा या तीन प्रसंगांचे वर्णन केल्यानंतर मला आणखी काही मतप्रदर्शन करण्याची गरज वाटत नाही. आपल्यासारख्या परदेशी राहणाऱ्या व्यक्तींना नक्कीच यातल्या काही बांधवांचे दर्शन कुठे ना कुठे तरी झाले असणार याची मला खात्री आहे. सरतेशेवटी एक नक्की सांगावेसे वाटते. मायदेशी असताना हे असले प्रसंग आणि अशी दृष्ये सतत दिसत असतात. तिथे हे सगळे नवे नाही.‘सबकुछ चलता है’, ‘यहाँ पे ऐसेही चलता है’, ‘करना पडता है’ वगैरे भंपक तत्त्वज्ञान सतत ऐकत आल्यामुळे आपल्या देशात ही बेशिस्ती, असंस्कृतपणा आपण सतत खपवून घेत असतो. किंबहुना आपणही त्याचाच एक भाग असतो. परदेशात आल्यावर इथली शिस्त बघून, वक्तशीरपणा बघून सुखावतो. असे शिस्तशीर वागले की विना कटकट कामे होतात, मनस्ताप होत नाहीत आणि असेही सुंदर जगता येते, सौजन्याने वागता येते याची जाणीव होते. त्यातून कधी तरी या शिस्तीच्या कारभारावर आपल्या बांधवांनी भारतीय छाप टाकली की नजरेतून सुटत नाही. उलट अधिकच नजरेला खुपते. आपल्याबद्दल, आपल्या देशबांधवांबद्दल इतर देशांमध्ये काय बोलले जाते, आपली तिथे कशी प्रतिमा आहे आणि याला जबाबदार आपणच कसे आहोत हे सतत जाणवत राहते. प्रत्येकाने काही थोडे संयमाने आणि सौजन्याने वागले तर ही परिस्थिती ओढवणार नाही. आता परदेशात आपण एवढ्या संख्येने येतो - पर्यटक म्हणून, नोकरदार म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून. आपल्या देशाचे आपण तिथे प्रतिनिधीच असतो. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारीही आपल्यावर असते. शेवटी भारत ‘माझा’ देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे आत्ता आहे त्यापेक्षा जाज्वल्य अभिमानाने आणि ताठ मानेनेच सतत सांगता यावे यासाठी थोडे अधिक सौजन्याने वागले तर प्रतिज्ञा खरी होईल. आणि शेवटी माझ्या देशावर माझेही प्रेम आहेच की आणि त्या प्रेमापोटीच हा लेखप्रपंच.
----------------------
