Saturday, December 1, 2012

भारत माझा देश आहे...

आपल्या देशाचा अभिमान असणे आवश्यकच आहे. मराठी माणसाला तर भारतीय असण्याचा त्यातून मराठी असण्याचा, नुसता नाही तर जाज्वल्य अभिमान असतो. आपल्या भारत देशाने एकविसाव्या शतकात खूप प्रगती केली आहे आणि आता आपण विकासाची नवी शिखरे गाठणार आहोत. आपला भारत देश जगात समर्थ राष्ट्र होणार आहे..... कोणत्याही व्यासपीठावरून (शाळेचे स्नेहसंमेलन, जाहीर सभा, कोपरा सभा, मेळावा, शिबिर, सत्कार समारंभ, निरोप संमारंभ, पुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलन,आणखी कसले संमेलन, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, गेला बाजार.. हास्य क्लबातसुद्धा) नेहमी ऐकू येणारे हे वाक्य. या कंसातील सगळ्या सोहळ्यांमध्ये शाल- श्रीफळाइतकेच महत्त्व भारताचा विकास आणि त्याबद्दलच्या अभिमानाला आहे. नाही... यात गैर काहीच नाही. मलाही माझ्या देशाचा अभिमान आहे. विशेषतः देशाबाहेर फिरताना तर भारतीयत्त्व प्रकर्षाने जाणवते. आपली ओळख प्रथम एक भारतीय म्हणून करून देतो आपण. परदेशात फिरताना नुसत्याच एशियन ऐवजी भारतीय म्हणून ओळखले गेलो तर उरात अभिमानच असतो फक्त. पण आपलेच देशबांधव कधी कधी असे वागतात की कुठे बघू असे होते. असे काही प्रसंग वाट्याला येतात की कधीकधी 'मी नाही त्या गावची' असे म्हणण्यात आनंद वाटतो. आपला महान देश, त्याची महान परंपरा यांच्याशी पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करते. (तशी प्रतिज्ञाच घेतली होती ना आपण सर्वांनी.) पण पर्यटनानिमित्त बाहेर फिरताना काही देशबांधव पाहिले की ते मात्र ही प्रतिज्ञा विसरलेले दिसतात. सौजन्याने वागण्याची प्रतिज्ञेतील साधी अपेक्षाही देशबांधव कधी कधी पूर्ण करत नाही. आपल्या देशाबद्दल मग बाहेरील जगात गैरसमज पसरत जातात किंवा आधीच पसरलेल्या गैरसमजांना आणखी खतपणी मिळत जाते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहेपण...हा पण समजावून सांगण्यासाठी मी नुकतेच अनुभवलेले तीन प्रसंग सांगते. तीनही प्रसंग परदेशात अनुभवायला आलेले. (चरितार्थ चालवण्यासाठी अस्मादिकांचा मुक्काम हल्ली इंग्लंडच्या परदेशात असतो हे आधी नमूद करते.)

प्रसंग १
स्थळ – स्कॉटलंड
काळ – ब्रिटनमधील लाँग वीकएंड

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण बघायला, ऐतिहासिक शहरे बघायला स्कॉटलंडला येणे झाल्यामुळे आमची स्वारी खुशीत होती. एडिंबरा शहर बघितले. स्कॉटिश तैनातीमधला भुईकोट किल्लाही (कॅसल) बघितला. तिथेच एडिंबरामधील भुईकोटाच्या दारात मराठी आवाज ऐकू आला. ‘ए चला लवकर... भेळेचे पुडे नंतर उघडा आधी आत या. अस्मादिकांना अधिक आनंद जाहला. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी आवाज कसा घुमतोय, हे प्रत्यक्ष ऐकू आले. आणखी एका हॉटेलमध्ये पुन्हा एक मराठी कुटुंब ऐकले’. या वेळी जाऊन ओळखही काढली. हल्ली किती ठिकाणी कसे भारतीय लोक भेटतात, याचे किस्से एकमेकांना ऐकवत निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्कॉटिश हायलंडची सफर करण्यासाठी एक टूर आरक्षित केली होती. वेळेत पोचण्यासाठी टूरची बस निघण्याची जागा आधीच शोधून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी हसतमुख आणि उत्साही स्कॉटिश गाईड लाभला आणि प्रवासाला सुरवात झाली. बसमध्ये बघतो तर काय २५ पैकी ८ -१० तरी चेहरे भारतीय वाटत होते. आनंद झाला. पुन्हा एकदा अभिमानाने ऊर भरून आला. उरलेले पर्यटक ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया अशा विविध देशांतून आले होते. टूर गाईडने ओळख करून देतानाच वेळेचे महत्त्व सांगितले आणि वर खास सूचना नमूद केली. काही देशांतील लोकांना वेळेचे फार महत्त्व नसते, तर अशांसाठी टूर थांबणार नाही. त्याच्या बोलण्याचा रोख आपल्या’ लोकांकडे कसा होता, याची मराठीत आपापसात चर्चा झडली. एकूणच भारतीयांना कसे उगीचच कमी लेखतात, आपली प्रगती त्यांना सहन होत नाही, जळतात... वगैरे निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो. त्या स्कॉटिश गाईडकडे एक तीव्र कटाक्ष टाकून गप्प बसलो.
पहिला फोटो स्टॉप झोकात पार पडला. दुसऱ्या स्थळी हवाई पाळण्यातून (याला सोप्या मराठीत केबल कार किंवा गंडोला म्हणत असावेत) डोंगरावर चढण्याचा प्रसंग आला. पुन्हा एकदा कसे वेळेत खाली येणे गरजेचे आहे, नाहीतर पुढचा कॅसल बघण्याची वेळ निघून जाईल वगैरे आमच्या स्कॉटिश गाईडने सांगितले. सगळे निसर्गदर्शन करून आम्ही वेळेत बसपाशी आलो. तेव्हा अर्धी बस रिकामी होती. पाच मिनिटांत उरलेले सहप्रवासी आले. तरी बसमधील प्रवासी संख्या चारने कमी होती. १० मिनिटे झाली... हे ४ जण अजून गायब होते. १५ मिनिटे, २० मिनिटे, २५ मिनिटे झाली तशी सर्वांची सहनशक्ती संपत आली. स्कॉटिश गाईडचे वेळेचे महत्त्व यावरील भाषण एकीकडे सुरूच. दिलेल्या वेळेपेक्षा तब्बल अर्ध्या तासाने हसत- खिदळत चौकडी बसकडे येताना दिसली. आम्ही खिडकीतून पाहतो तो काय… ते तर एतद्देशीय बांधव निघाले. बसजवळ येताच आपणच उशीरा आलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे. कारण चेहऱ्यावरील भाव चटकन बदलले. ते आत येण्याआधी खाली उतरून आमच्या स्कॉटिश गाईडने त्यांना काहीतरी सुनावले असणार. बस सुरू करण्यापूर्वी त्याने एक तीव्र कटाक्ष आमच्यावरही टाकल्याचा भास झाला. काहीच चूक नसताना आमची मान अपराधी असल्यासारखी खाली गेली आणि तो नव्या जोमाने इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये कसे वेळेचे महत्त्व पाळले जाते हे सांगू लागला. यापुढे बस कोणासाठीही थांबणार नाही हेदेखील त्याने पुन्हा सांगितले. तीन दिवसांच्या या प्रवासात असा अनुभव आणखी एकदा आला हे विशेष. या वेळी अर्धा तासाऐवजी १० मिनिटे थांबावे लागले आणि लेट लतीफ पुन्हा दुसरे एक आपले भारतीय जोडपे.
***
प्रसंग २
स्थळ – हायडेलबर्ग, जर्मनी
काळ – दुसरा एक लाँग वीकएंड

ब्रिटनमुक्कामी असेपर्यंत देशाटन करून घ्यावे आणि थोडे आणखी शहाणपण मिळवावे असे वाटत असल्याने शक्य तेवढा आणि झेपेल तेवढा प्रवास करण्याचे ठरविले होते. त्यातून केल्याने (पर)देशाटन येते (जास्त) शहाणपण असा आम्हीच अर्थविस्तार केला. प्रथम जर्मनीकडे प्रस्थान ठेवले. गेल्या वेळी स्कॉटिश गाईडने केलेला भारतीय बांधवांचा उद्धार लक्षात ठेवून या वेळी लंडनस्थित अस्सल भारतीय पर्यटन कंपनीची टूर निवडली होती. तर अशा प्रकारे एतद्देशीय बांधवांच्या साथीत पहिलाच मुक्काम जर्मनीतील हायडेलबर्ग नामे शहरात घडला.
मुक्कामाचे हॉटेल सुंदर होते. परकीयांच्या दर्जापरीक्षणानुसार म्हणे तीन तारांकितही होते. खोल्या स्वच्छ आणि आवश्यक गोष्टींनी सजवल्या होत्या. आमच्या भारतीय मनोवृत्तीनुसार हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वप्रथम लक्षात घेतले जाते स्वच्छतागृह. त्यातील स्वच्छता बघूनच आम्ही हॉटेलचा दर्जा ठरवतो. तर त्याप्रमाणे आम्ही या तीन तारांकित हॉटेलचे स्वच्छतागृह तपासून पाहिले. दारातच आमच्यासाठी एक पत्रक आढळले. त्यावर स्वच्छतागृहाच्या वापराविषयी माहिती होती. हॉटेल व्यवस्थापकाच्या सहीने असलेली तळटीप मात्र लक्षवेधक होती. भारतीय ग्राहकांसाठी असे ठळक अक्षरात लिहून परकीय पद्धतीचे शौचालय भारतीय लोक कसे अयोग्य रितीने वापरून खराब करतात हे उद्धृत करून वर ते आपण कसे वापरायला पाहिजे याचा खुलासा लिहीला होता. आता जगभर फिरणाऱ्या आमच्या भारतीय बांधवांना काय शौचालय वापरता येत नसेल का, असा विचार आला. वर फक्त भारतीय ग्राहकांसाठी असे लिहून आमच्या मूळ स्वच्छता सवयींवरच अविश्वास दाखवला गेला होता. स्वाभिमानी भारतीय मन त्यामुळे दुखावले गेले. खोलीत अर्थातच कसे अजूनही भारतीयांना कमी लेखतात, खरे तर युरोपीय पर्यटनस्थळांवर आजकाल चीनी लोकांखालोखाल भारतीयांचीच गर्दी असते, जग फिरण्याची आमची क्षमता आहे आणि धमकही आहे वगैरे चर्चा रंगली. थोड्या वेळाने जेवायच्या टेबलावरदेखील याविषयी आजूबाजूच्या टेबलवरून चर्चा ऐकली. शेवटी लंडनस्थित अस्सल भारतीय कंपनीच्या व्यवस्थापकापुढे आमच्या मनातील खेद सामूहिकरित्या व्यक्त करण्यात आला. भारतीयांच्या स्वच्छतेविषयीच्या सवयींवर आक्षेप व्यक्त करणाऱ्या आणि परिणामी भारतीयांना कमी लेखणाऱ्या हॉटेलमध्ये आमची सोय एका भारतीय कंपनीनेच का करावी, असा सवालही उपस्थित झाला. या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त झाला. त्यावर त्या लंडनस्थित भारतीय कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली पण हे पत्रक इथे उतरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयीचा अनुभव लक्षात घेऊनच लिहिले गेले आहे. आपल्यापैकी काही लोकच याला जबाबदार आहेत’, अशी मल्लीनाथीही वर केली. जी आमच्यासह कित्येकांस रुचली नाही.
पुढील दोनच दिवसात लंडनस्थित अस्सल भारतीय कंपनीचा व्यवस्थापक खोटे बोलत नव्हता हे सिद्ध झाले. स्वित्झर्लंड मुक्कामी तेथील हॉटेलमधील एका खोलीतील स्वच्छतागृह तुंबल्याची आणि ते आपल्यापैकीच एकाने अयोग्य तऱ्हेने वापरल्याची खबर आली. बातमी ऐकताना पुन्हा एकदा स्वित्झर्लंडच्या अनुभवासारखीच आमची कोणतीही चूक नसताना आमचीच मान शरमेने खाली झाली.
या प्रवासात एकदा नाही तर अनेक वेळा हा मान खाली जाण्याचा प्रसंग आमच्यावर गुदरला. स्वित्झर्लंडमधील माउंट टिटलीस या आल्प्स पर्वतराजीतील एका शिखरावर आम्ही चढलो होतो. चढलो म्हणजे हवाई पाळण्यातून गेलो आणि शिखरावर उतरलो. तिथल्या हिमाच्छादित सौंदर्याने भारावून गेलो. आपल्या (पुन्हा आपल्या) हिमालयावर देखील अशी कितीतरी सौंदर्यस्थळे आहेत. तिथे अशी पर्यटन स्थळे विकसित करता येतील, ती का बरे होत नसावीत, किंबहुना हिमालयाचे सौंदर्य काकणभर जास्तच असेल,ते कदाचित थोडे रौद्र भासेल वगैरे सखोल चर्चा त्या टिटलीस पर्वतशिखरावरच्या गोठवणाऱ्या थंडीत उभे राहून केली. छायाचित्रांचा कार्यक्रम उरकला आणि बर्फात साकारलेले मानवनिर्मत सौंदर्य निरखण्यासाठी 'आईसकेव्ह'चा रस्ता धरला. बर्फाच्या गुहेत बर्फातूनच साकारलेले विविध आकार, बर्फाच्या वस्तू न्याहाळत होतो. तेवढ्यात त्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या लादीवर उठून दिसेल अशी लालेलाल खूण नजरेस आली. पान अगर तंबाखू (गुटखा, मावा, जर्दा की आणखी काही) खावून थुंकलेली ती रंगीत पिचकारी पाहिली आणि शरमेने मान खाली जाण्याआधी मस्तकात तिडीक गेली. आमच्या आधी तिथे एक मोठा भारतीय गट येऊन गेला होता आणि हे रंगकाम त्यांच्यापैकीच कोणाचे तरी असणार हे तिथल्या बर्फाइतकेच पारदर्शी होते.
आणखी एकदा स्वित्झर्लंडमधीलच एका रेल्वे प्रवासात खिडकीतून एक पाण्याची रिकामी बाटली आणि प्लॅस्टिकचे पुडे भिरकावलेले पाहिले. भिरकवणाऱ्या हातांचा नजरेने शोध घेतला तेव्हा सोन्याच्या बांगड्या घातलेला पाचवारी साडीतील हात दिसला. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
***
प्रसंग ३
स्थळ – पॅरिस, फ्रान्स
काळ – तिसरा आणि उन्हाळ्यातील शेवटचा लाँग वीकएंड

कला, संस्कृती, सौंदर्य अशी नजाकतीने भरलेली फ्रान्सची राजधानी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. दिवस तसा छान उन्हाळी असल्यामुळे पॅरिस गजबजलेले होते. कदाचित जोडून सुटी आल्यामुळे जिथे –तिथे माणसांचे जथ्थे दिसत होती. पर्यटकांसाठी पंढरी असलेल्या पॅरिसमध्ये नेहमीच अशी गर्दी असते म्हणे, आमच्याबरोबरच्या जाणकारांनी माहिती पुरवली. पॅरिसनगरीच्या शिरपेचातील तुरा शोभणाऱ्या आयफेल टॉवरला भेट देण्यास उत्सुक होतो. तिथे गेल्यावर समजले की या टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर घेऊन झाणारा एकच विजेचा पाळणा (सोप्या मराठीत लिफ्ट) सुरू आहे. इतर तीन पाळणे बंद असल्यामुळे वर जाण्यासाठी उत्साही पर्यटकांची ही लांब रांग लागली होती. किमान ३ तास उभे राहावे लागणार, असे पुन्हा जाणकारांनी सांगितले. पण इलाज नव्हता. पॅरिसनगरीचे सौंदर्य त्या जागतिक आश्चर्य मानल्या गेलेल्या टॉवरवरून बघण्याची ओढ लागली होती. हळूहळू सरकणाऱ्या रांगेत धीर न सोडता वाट बघत होतो. बरोबरचे काही आपले भारतीय बांधव फारच अधिर झाल्याचे जाणवले. मुले-बाळे बरोबर असणाऱ्यांचे तिथेच खाऊच्या पुड्या सोडणे सुरू झाले. मग खाऊन-पिऊन तृप्त झाल्यावर याच मुलांचा रांगेतून पुढे – मागे खेळ सुरू झाला. मुलांपेक्षाही अधिर असलेल्या त्यांच्या पालकांनी मग शक्कल लढवली. अरे बेटा किधर जा रहे हो’, असा नारा देत मुलांना दिले रांगेत सोडून. बच्चे कंपनी (खेळता खेळता) पुढे गेली आणि मागून त्यांचे चाणाक्ष पालक बच्चे है असे म्हणत हसत हसत चक्क पुढे जाऊन उभे राहिले. या प्रकाराला सभ्य मराठीत घुसखोरी म्हणत असावेत. रांगेतील इतर पर्यटकांनी या प्रकाराबाबरत नापसंती व्यक्त केली. पण आपण त्या घुसखोरीच्या गावचेच नसल्याचा आव त्या अधिर पालकांच्या चेहऱ्यावर होता. उलट आपल्या अक्कलहुशारीमुळे आणि आपल्या लाडक्या मुलांच्या कर्तृत्त्वाने आपण कसा एक तास वाचवला याचेच तोंडभर सुख तिथे होते. आपल्यासारखे भारतीय प्रवासी रांगेतून थोडे जरी इकडे तिकडे करू लागले की गोऱ्या कपाळांवर चटकन आठ्या का पडतात, याचा उलगडा आत्ता झाला.
फ्रान्समधील गर्दीच्या आणखी एक- दोन पर्यटनस्थळांवर असेच अनुभव आले. बसमधून उतरल्यावर आपणच कसे आधी पोचणे आवश्यक आहे, अशा भावनेत आपले बांधव अक्षरशः पळताना पाहिले. रांगेची शिस्त सर्वांना ही पाटी फक्त सगळीकडे लिहीलेली असते. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, या थाटात आपल्या देशात आपण वावरतो. इथेही तीच भावना दिसली. छायाचित्र काढतानादेखील भारतीय अधीरता दिसत होती. भरभर पुढे जाऊन मोक्याच्या ठिकाणी उभे राहायचे आणि दुसऱ्यांच्या छायाचित्रांतही आपली छबी कशी येईल, याची दखल घेण्याचे उद्योग सुरू होते. बसमध्ये गाईड काही माहिती देत असेल, टूरमध्ये काही महत्त्वाच्या सूचना सुरू असतील तेव्हाच आपल्या भाचेमंडळींना (बांधवांचा बालचमू) कसे रडावेसे, ओरडावेसे वाटते आणि त्यांनी शांत राहावे असे त्यांच्या पालकांनाच कसे वाटत नसते हेही वारंवार अनुभवले.  भारतीय पर्यटकांची बस येताना दिसली की बाकीचे पर्यटक तिथून काढता पाय घेत असावेत, असे जाणवले. मी नाही हो त्या गावची हे तिथे म्हणावेसे वाटले. शरमेने मान खाली जाणे, मस्तकात तिडीक जाणे यानंतरची ती पायरी होती. सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे म्हणताना आता नेहमी याबंधू-भगिनींची आठवण झाली.
***
तर अशा या तीन प्रसंगांचे वर्णन केल्यानंतर मला आणखी काही मतप्रदर्शन करण्याची गरज वाटत नाही. आपल्यासारख्या परदेशी राहणाऱ्या व्यक्तींना नक्कीच यातल्या काही बांधवांचे दर्शन कुठे ना कुठे तरी झाले असणार याची मला खात्री आहे. सरतेशेवटी एक नक्की सांगावेसे वाटते. मायदेशी असताना हे असले प्रसंग आणि अशी दृष्ये सतत दिसत असतात. तिथे हे सगळे नवे नाही.सबकुछ चलता है’, यहाँ पे ऐसेही चलता है’, करना पडता है वगैरे भंपक तत्त्वज्ञान सतत ऐकत आल्यामुळे आपल्या देशात ही बेशिस्ती, असंस्कृतपणा आपण सतत खपवून घेत असतो. किंबहुना आपणही त्याचाच एक भाग असतो. परदेशात आल्यावर इथली शिस्त बघून, वक्तशीरपणा बघून सुखावतो. असे शिस्तशीर वागले की विना कटकट कामे होतात, मनस्ताप होत नाहीत आणि असेही सुंदर जगता येते, सौजन्याने वागता येते याची जाणीव होते. त्यातून कधी तरी या शिस्तीच्या कारभारावर आपल्या बांधवांनी भारतीय छाप टाकली की नजरेतून सुटत नाही. उलट अधिकच नजरेला खुपते. आपल्याबद्दल, आपल्या देशबांधवांबद्दल इतर देशांमध्ये काय बोलले जाते, आपली तिथे कशी प्रतिमा आहे आणि याला जबाबदार आपणच कसे आहोत हे सतत जाणवत राहते. प्रत्येकाने काही थोडे संयमाने आणि सौजन्याने वागले तर ही परिस्थिती ओढवणार नाही. आता परदेशात आपण एवढ्या संख्येने येतो - पर्यटक म्हणून, नोकरदार म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून. आपल्या देशाचे आपण तिथे प्रतिनिधीच असतो. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारीही आपल्यावर असते. शेवटी भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे आत्ता आहे त्यापेक्षा जाज्वल्य अभिमानाने आणि ताठ मानेनेच सतत सांगता यावे यासाठी थोडे अधिक सौजन्याने वागले तर प्रतिज्ञा खरी होईल. आणि शेवटी माझ्या देशावर माझेही प्रेम आहेच की आणि त्या प्रेमापोटीच हा लेखप्रपंच.
----------------------


(हॉलंडमधून प्रकाशित झालेल्या 'रश्मिन' या दिवाळी अंकात हा लेख प्रथम प्रकाशित झाला आहे.)

Good old Indian habits

I'm writing this post after a long gap. Its been quite a time after the Europe tour, but the European Fiesta is still on the mind.  The reflections of those snowy mountain caps, the lakes, monuments simply not letting me send them off the mind. There is yet another reason that I keep recollecting those moments of the tour. I'm still in a mood to study the impressions of we Indians on the people here. We came across so many Indians during this tour that now I tend to believe that Indians are the most travel-loving community in the world. It was great to see so much Desi crowed on board. They made the trip more friendly. But there were few moments of embarrassment also. I realized during the tour that Indians are still known abroad for their same good old habits. Punctuality as per our own IST, untidiness and those famous lines 'Sab kuch Chalta hai'. We got to experience this Indian attitude so many times during the tour, that when I was asked to write about my experiences for one Diwali ank, this was the only thing which I wanted eagerly to write about.

You can read the full article in the post to follow. The point of sharing these experiences is again little selfish. It  will help me to behave myself. I should not be responsible in any way for firming those embarrassing  impressions of my nation. This writing will always remind me to take care about it.

Wednesday, July 11, 2012

Bollywood rocks


I'm a big fan of Hindi movies. I love to watch Cinema and like to appreciate it. But some people like to live that filmy life. Their emotions, expectations, comments, reactions,  feelings are as per the guide book called Bollywood movies. I've seen these stereotypical characters romancing around since my college days. Any ways...that is another story. But I was not aware how much this so called Bollywood has its impact world over. 
To go on the same lines of last post, Shahrukh Khan is supposedly India's representation in Europe. I was quite astonished to see his presence on Swiss mountaintops and in Italian market places.

Bollywood in Alps
Mt Titlis is one of the leading attractions for tourists in Switzerland. We have to take 3 cable cars to reach the top of the mountain. As you elevate, you could see picturesque Alps around you. There is a nice Restaurant,  Swiss cultural exhibition and ice caves on top. There's a viewing gallery which takes you out in snow park. As we came out to enter Snow park...there were these 'good old friends' to receive us. Shahrukh Khan and Kajol. They are there at height of 3000 meters above sea level and thousands of miles away from actual Bollywood. Yeah they are there in life size cut-outs. And let me tell you there is no other cut-out or poster around. There is nothing else but these two standing on sparkling white snow. Our Indian friends were posing merrily with Kajol and Shahrukh in Swiss. LOL !!
Check the location of Bollywood Restaurant
One more to go...Indian food abroad needs a separate post.  You get excellent Punjabi food on Mt Jungfrau..another mountain top in Swistzerland... No brownie points to guess the name of the Restaurant now... Yes its  Bollywood Restaurant !! 

Mt Jungfraujoch is one more famous tourist destination in Swiss. It's altitude is even higher than Mt Titlis and only a mountain train takes you to the top. Jungfraujoch is the highest altitude train station in Europe. As per any other tourist destination you will get Sandwiches, tea /coffee in small stalls here. Only two full fledged restaurants are there. One is Chinese and another apna Indian. Bollywood rocks !!

Tuesday, July 10, 2012

Namaste, Shukriya and Shahrukh khan, Sonia Gandhi

The first thing I realized coming here in UK – We have to redefine our identity here. All the Indians here refer each other as ‘desi’ and rest of the Europeans refer us as 'Asians' and not 'Indians' specifically. All the restaurants serving Indian food are 'Indian restaurants' or 'desi restaurants'; although half of them are run by our Bangladeshi, Srilankan or Pakistani bhai.
So I was just an Asian to the localites . Although you are a foreigner here in London, you are expected to know their language well. Plus you have to understand the British culture too. And it’s quite fair on their part, after all we are well exposed to this Englishness for not less than 150 years.
Shahrukh at Mt Tirlis, Switzerland
But cross the English channel and realise the difference. You will be treated as ‘Indians’. This was my experience. At least in well crowded tourist places, you will surely get the greeting ‘Namaste’ if you are travelling with Indian group. They recognise you as 'Indians' and not mere 'Asians'. They will make sure, you are comfortable in their country by greeting in your native language. This was my experience in France, Switzerland, Austria and Italy as well. Sometimes to lure you buying things, Salesman may speak few Hindi words. Knowing that, these are all salesman's tactics.. still, it creates certain warmth.

In a patience testing (read never ending) queue for Eiffel tower top floor when you hear a 'Shukriya' from a guard at Baggage check counter, it certainly gives pleasure. A French guy is saluting you in Hindi,...  feels good specially after your English experience.

Italian Connection
This was quite frequent in Italy. I was welcomed by one Italian shopkeeper by salutation in Italy followed by 'India - Italy; I -I.... equal' !!!!  Again a feel good factor. So we are equal finally. (Don't ask me whether this realisation is on the backdrop of this infamous Italian economy Shrink).
On a busy Saturday afternoon, we sailed through a boat to reach the famous city of Canals - Venice.  In a very crowded dock area in Venice, a salesman selling souvenirs tried convincing us by greeting ‘Namaste’ followed by words 'you from India – India - Shahrukh Khan'.Now, that was a kick. So Shahrukh is the identity of Indians abroad!! Phew!!! (Satyamev Jayate :P Alas !!)
No need to tell you that I didn't bother to even look at items he was selling. 

One more example again from this Italian Canal city. Venice is also known for its glass works/ artifacts apart from Gondolas...specially Murano glass. Murano Island is the famous tourist place for its glass factories. You can get to see demonstrations of the art here. We visited one of the Murano glass factories and the person giving demonstration of their work concluded with 'Shukriya' saluting towards our Indian group. Furthermore wittingly he told us, 'Give my regards to our Sonia Gandhi'. 

Monday, July 9, 2012

European voyage



Europe tour was like a dream come true. I had fascination of those snow clad Alps since I read about them in Geography text book at school. I fell in love with those Austrian Alps even more after watching Sound of Music. Same was the case with Eiffel tower, Leaning tower of Pisa, Colosseum, The Vatican and much more. Although we see them n number of times on screen, in photos, through books, through memoirs and through every other media; those European wonders always remain in the wish list. And those famous 'I was there' kind of photo shoots are bound to happen.  
To cover 7 countries within 14 days seemed impractical for a while. But yeah we can at least get a glimpse of it for sure. And believe me, some European nations are quite small... tiny I should say. Lichtenstein is one of these tiny states. What fascinates me out here is mere size of the county. Of course, one cannot say I've seen the country in such a limited time. But yes, you can get that 'feel' of the nation for sure. These European countries are so much closely existent that you can see the boundaries changing rapidly in front of your eyes...within hours of road travel. The culture, language and the lifestyle change just within 2-3 hours. And I found Advertisement hoardings, sign boards on motor ways, house patterns, restaurant boards, food available on road side Services as perfect medium to depict these changes. They show it so much instantly and perfectly.
In the posts to follow, I'll try and narrate these imprints of my voyage. So stay online to watch this space.

Wednesday, July 4, 2012

मुठेपासून थेम्सपर्यंत



माणूस  कुठेही  गेला, तरी त्याच्या जन्मभूमीला विसरू शकत नाही; तीच त्याला प्रिय असते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि | त्यातून ही जन्मभूमी पुणे असेल तर मग काय विचारता, त्याच्यासारखापुण्यवान तोच. कुठेही गेलात तरी पुणेरी बाणा सोडत नाही, तो पुणेकर. पुलंनी सांगून ठेवलेलं आहे, पुणेकर होणं कसं आणि किती अवघड आहे ते ! तर पूर्वीचं पुणं आता राहिलेलं नाही, किंवा आमच्या वेळी असं नव्हतं वगैरे म्हणण्याचं माझं वय नाही, पण पुणेकर असल्यामुळे ते येणं अपरिहार्य आहे. आजचं पुणं खूपच बदललं आहे. मुठेकाठचं सोवळ्यातलं आटपाट नगर जाऊन आता कॉस्मोपॉलिटन, चकाचक इमारती, मॉल-मल्टिप्लेक्सनं नवं रूप पुण्याला दिलंय. आता हे पुणं जगातल्या बड्या शहरांशी नक्कीच स्पर्धा करू शकेल. पुणं सोडून पहिल्यांदाच भारताबाहेर लंडनला येण्याचा आणि इथे राहण्याचा योग आला आणि लंडनमधला पुणेरीपणा मन आपोआप शोधत गेलं.

लंडनआयमधून दिसणारी थेम्स
सगळ्यात पहिल्यांदा जुन्या लंडनमध्ये गेले (जुन्या पुण्याच्या धर्तीवर)... इथे याला सेंट्रल लंडन म्हणतात, तेव्हा तिथल्या जु्न्या इमारती पाहिल्या, थेम्स नदी पाहिली त्यावरचे पुल पाहिले आणि पुण्याची आठवण झाली. लंडन व्हिक्टोरिया, वॉटर्लू ही रेल्वे स्टेशन्स पाहिली की मात्र मुंबई आठवते. साहेबाने अगदी त्यांच्या देशातलं वाटावं असंच टर्मिनस मुंबईत उभारलं. आम्ही मात्र आता हे लंडन व्हिक्टोरिया किती (आपल्या) व्हीटीसारखं आहे ना’!, असंच म्हणतो. लंडन आयच्या मोठ्या चक्रातल्या काचेच्या कुपीत बसल्यावर या जुन्या लंडनचा देखणा एरियल व्ह्यू मिळतो. लंडन कसं दिमाखदार आहे, हे तिथे जाणवतं. या कुपीत बसल्यावर खाली थेम्स दिसली तेव्हा खरं पुण्याची आठवण झाली. अर्थातच मुठेपेक्षा चांगलंच मोठं पात्र आणि मुख्य म्हणजे वाहती नदी आहे ती! मुठेला पावसाळ्याखेरीज नदी म्हणंणंही जीवावर येतं. पण नदीच्या काठी वसलेलं जुनं शहर, तिथल्या इमारती, राजवाडा आणि एकापाठोपाठ एक दिसणारे पूल पुण्याची आठवण हटकून देतात. आपल्याही नदीकाठच्या एखाद्या बागेत असं बर्डस आय व्ह्यू  देणारं जायंट व्हील बांधलं तर कसं दिसेल, हा विचार लगेच मनात डोकावला. वळणदार मुठा नदीवर असेच एकामागे एक पूल, भव्य शनिवार वाडा, (विश्रामबाग वाडा मात्र दिसणार नाही, त्या दिशेला दिसेल ती फक्त उंच इमारतींची गर्दी) संभाजी बागेच्या आसपास मर्यादित असली तरी ती नदीकाठची हिरवाई आणि एकमेकांना खेटून उभी असलेली जुनी घरं... हे सगळं वरून बघताना छानच दिसेल. हा विचार येतानाच पुण्याचं सध्याचं नवं रूप आठवलं आणि वाटलं... या सगळ्याबरोबर होर्डिंगची गर्दीच जास्त दिसेल. असं होर्डिंगवालं विद्रूप शहर पाहण्यापेक्षा ते मनातल्या मनात बांधलेलं पुणे आयमी तातडीने उतरवलं.
पुण्याकडे खरं तर दाखवण्यासारखं खूप वैभव आहे. चारही बाजूंनी वेढलेल्या टेकड्या, नद्या- नाले असा निसर्ग आहे. पण त्या टेकड्यांवर पसरलेल्या झोपड्या, नद्यांचं गढूळलेलं पाणी, दुर्गंधी आणि प्रदूषित नाले आणि आराखड्याविना अस्ताव्यस्त पसरलेलं शहर एवढंच आजचं रूप झालं आहे.
आपली राजधानी सजवताना ब्रिटिशांनी मात्र खरोखर कमाल केली आहे. इंग्रजांनी किती दूरदृष्टीने नगररचना केली होती, हे या सेंट्रल लंडनमध्ये कळतं. येणाऱ्या काळात राजधानीमध्ये लोकसंख्या वाढणार आहे. जगभरातून लोक येऊन गर्दी वाढणार, वाहतूक वाढणार आणि रस्ते तेवढेच राहणार. हा विचार करून भुयारी रेल्वे इथे सुरू झाली... तब्बल १५० वर्षांपूर्वी.. १८६३ मध्ये. पुण्यात अजूनही मेट्रो करायची की भुयारी रेल्वे की स्कायबस यावरचे वाद रंगताहेत. सेंट्रल लंडनमधले रस्ते तसं पहायला गेलं तर अगदी  छोटे आहेत, आपल्या कुमठेकर किंवा लक्ष्मी रस्त्याएवढेच. त्यामुळे वाहतुकीची कोंडी अटळ. पण वाहतूकीचे नियम पाळले जात असल्यामुळे परिस्थिती खूपच आवाक्यात आहे.

पुण्याची वाहतूक हा खरं तर वेगळ्या लेखाचा विषय आहे. सध्याच्या पुण्याचा विचार करताना वाहतूकीची कोंडी आणि सार्वजनिक वाहतूक साधनांचा अभाव या गोष्टी टाळताच येणार नाहीत. छोटे रस्ते आणि तुलनेने प्रचंड वाढलेली वाहतूक यावर उपाय पुण्याला अद्याप सापडला नाहीयं. रस्ते रुंदीकरण विशेषतः मध्य पुण्यातले आता जवळजवळ अशक्य आहे. कारण नगररचना करताना पुढच्या काळात वाढणाऱ्या शहराचा विचारच बहुधा झाला नसावा. जुन्या इमारतींमधून मिळेल तसे रस्ते काढले आहेत. तशीच परिस्थिती काहीशी सेंट्रल लंडनची आहे. पण तिथे अर्थातच ट्यूब आणि बसचं जाळं असल्याने आणि दृष्ट लागावी एवढी नियमित सेवा असल्यामुळे आपलं वाहन गर्दीत घुसवून जमेल तसं हाकायची कसरत लंडनकरांना करावीच लागते असं नाही. उलट जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा आणि कमीत कमी खासगी वाहने या गर्दीच्या रस्त्यावर यावीत, यासाठी लंडन प्रशासन खास उपाययोजना करत आहे. लंडन कंजेशन चार्ज या नावाने ठकाविक रक्कम वाहनचालकांकडून वसूल केली जाते. सेंट्रल लंडनमध्ये अधिक वर्दळीच्या रस्त्यांवर ठराविक गर्दीच्या वेळी खासगी वाहनाने जायचे असेल तर दिवसाला १० पाउंड एवढी फी द्यावी लागते. २००३ पासूनच ही व्यवस्था सुरू केली आहे आणि आधी प्रायोगिक तत्त्वावर असणारे कंजेशन चार्ज झोन्स आता वाढलेही आहेत.

लंडनमध्ये रस्तारुंदीकरणाला जागा नाही, याचं कारण जुन्या इमारती. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असणाऱ्या या इमारतींचं ऐतिहासिक मोल लंडनकर जाणतात. म्हणूनच त्या इमारतींना धक्का न लावता विकास केला जातो. आपल्याकडे मात्र जुन्या इमारती सर्रास पाडून पुन्हा त्याच जागी नवी टोलेजंग  इमारती बांधली जाते. पुण्याचं वैशिष्ट्य असणाऱ्या वाडा संस्कृतीचे आता केवळ अवशेष बघायला मिळतात. जुन्या वास्तू संवर्धनाची कला आत्मसात करून लंडनकर मात्र त्यांची संस्कृती जतन करून आहेत.  व्हिक्टोरियन शैलीतल्या कितीतरी इमारती आजही सुस्थितीत उभ्या आहेत. इमारतींचं सरासरी वय किमान १०० वर्ष तर नक्कीच आहे. फक्त अमीर उमराव किंवा राजे-रजवाड्यांचेच महाल नाहीत, तर सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या इमारती तशाच ठेवल्या आहेत.  बाहेरून बघताना जुन्या वाटणाऱ्या या इमारती आतून अत्याधुनिक सुखसुविधांनी सज्ज असतात.
अस्सल लंडनकराला त्यांच्या शहराचा, तिथल्या जु्न्या इमारतींचा, कलेच्या संस्कृतीचा आणि एकूणच इतिहासाचा विलक्षण अभिमान. आपल्या पुणेकरांकडेही हा जाज्वल्य अभिमान असतो, हे मान्य. पण आपला अभिमान केवळ ऐतिहासिक वैभवाचे गोडवे गातानाच संपतो. उरलं सुरलं वैभव तरी जपण्यासाठी आपण काय करतो? सामान्य पुणेकर सांस्कृतिक- ऐतिहासिक वारसा जपण्याची आस्था दाखवत नाही, तिथे प्रशासन काय करणार ! पुण्याचं वैशिष्ट्य तिथल्या संस्कृतीमध्ये आहे, आणि तीच आता हरवत चाललीय. संस्कृती जपणाऱ्या जुन्या लंडनमधून फिरताना ही खंत कायम सलत राहतेय.





First post - पहिलं पान

आख्यान....Narration. The name of the blog is just to depict my intention of writing. I'm basically a journalist by profession. But here the posts will be just my narration of events, routine, journeys, episodes, conflicts or whatever that comes on to mind. No intention of writing a tight news story with all basic 5 Ws and 1 H in it. 
Do let me know how do you like my Aakhyan. Suggestions, Questions, Comments and compliments are always welcome.

लेखनाचा उद्देश विश्लेषण करणे असा नाही किंवा माहिती पुरवणे, ज्ञान देणे असाही नाही. आख्यानांचा रोख तसा कधी वाटलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा. 
आणि एक..
माझं आख्यान आवडलं तर जरुर सांगा. नाही पटलं तरीही जरूर सांगा.