माणूस
कुठेही गेला, तरी त्याच्या
जन्मभूमीला विसरू शकत नाही; तीच त्याला प्रिय
असते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि | त्यातून ही जन्मभूमी पुणे असेल तर मग काय विचारता, त्याच्यासारखा ‘पुण्य’वान तोच. कुठेही
गेलात तरी पुणेरी बाणा सोडत नाही, तो पुणेकर. पुलंनी सांगून ठेवलेलं आहे, पुणेकर होणं कसं
आणि किती अवघड आहे ते ! तर पूर्वीचं पुणं आता राहिलेलं नाही, किंवा आमच्या वेळी
असं नव्हतं… वगैरे म्हणण्याचं माझं वय नाही, पण पुणेकर असल्यामुळे ते येणं अपरिहार्य आहे. आजचं पुणं खूपच बदललं आहे. मुठेकाठचं सोवळ्यातलं आटपाट नगर जाऊन आता कॉस्मोपॉलिटन, चकाचक इमारती, मॉल-मल्टिप्लेक्सनं नवं रूप पुण्याला
दिलंय. आता हे पुणं जगातल्या बड्या शहरांशी नक्कीच स्पर्धा करू शकेल. पुणं सोडून पहिल्यांदाच भारताबाहेर लंडनला येण्याचा आणि इथे राहण्याचा
योग आला आणि लंडनमधला पुणेरीपणा मन आपोआप शोधत गेलं.
| लंडनआयमधून दिसणारी थेम्स |
पुण्याकडे खरं तर दाखवण्यासारखं
खूप वैभव आहे. चारही बाजूंनी वेढलेल्या टेकड्या, नद्या- नाले असा निसर्ग आहे. पण त्या टेकड्यांवर पसरलेल्या झोपड्या, नद्यांचं गढूळलेलं पाणी, दुर्गंधी आणि प्रदूषित
नाले आणि आराखड्याविना अस्ताव्यस्त पसरलेलं शहर एवढंच आजचं रूप झालं आहे.
आपली राजधानी सजवताना ब्रिटिशांनी
मात्र खरोखर कमाल केली आहे. इंग्रजांनी किती दूरदृष्टीने नगररचना केली होती, हे या सेंट्रल लंडनमध्ये कळतं. येणाऱ्या काळात राजधानीमध्ये
लोकसंख्या वाढणार आहे. जगभरातून लोक येऊन गर्दी वाढणार, वाहतूक वाढणार आणि रस्ते तेवढेच राहणार. हा विचार
करून भुयारी रेल्वे इथे सुरू झाली... तब्बल १५० वर्षांपूर्वी.. १८६३ मध्ये.
पुण्यात अजूनही मेट्रो करायची की भुयारी रेल्वे की स्कायबस यावरचे वाद रंगताहेत. सेंट्रल
लंडनमधले रस्ते तसं पहायला गेलं तर अगदी
छोटे आहेत, आपल्या कुमठेकर किंवा लक्ष्मी रस्त्याएवढेच.
त्यामुळे वाहतुकीची कोंडी अटळ. पण वाहतूकीचे नियम पाळले जात असल्यामुळे परिस्थिती
खूपच आवाक्यात आहे.
पुण्याची वाहतूक हा खरं तर वेगळ्या
लेखाचा विषय आहे. सध्याच्या पुण्याचा विचार करताना वाहतूकीची कोंडी आणि सार्वजनिक
वाहतूक साधनांचा अभाव या गोष्टी टाळताच येणार नाहीत. छोटे रस्ते आणि तुलनेने
प्रचंड वाढलेली वाहतूक यावर उपाय पुण्याला अद्याप सापडला नाहीयं. रस्ते रुंदीकरण
विशेषतः मध्य पुण्यातले आता जवळजवळ अशक्य आहे. कारण
नगररचना करताना पुढच्या काळात वाढणाऱ्या शहराचा विचारच बहुधा झाला नसावा. जुन्या इमारतींमधून मिळेल तसे रस्ते काढले आहेत. तशीच परिस्थिती काहीशी
सेंट्रल लंडनची आहे. पण तिथे अर्थातच ट्यूब आणि बसचं जाळं असल्याने आणि दृष्ट
लागावी एवढी नियमित सेवा असल्यामुळे आपलं वाहन गर्दीत घुसवून जमेल तसं हाकायची
कसरत लंडनकरांना करावीच लागते असं नाही. उलट जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक
ट्रान्सपोर्टचा वापर करावा आणि कमीत कमी खासगी वाहने या गर्दीच्या रस्त्यावर यावीत, यासाठी लंडन प्रशासन खास उपाययोजना करत आहे. लंडन कंजेशन चार्ज या नावाने
ठकाविक रक्कम वाहनचालकांकडून वसूल केली जाते. सेंट्रल लंडनमध्ये अधिक वर्दळीच्या
रस्त्यांवर ठराविक गर्दीच्या वेळी खासगी वाहनाने जायचे असेल तर दिवसाला १० पाउंड
एवढी फी द्यावी लागते. २००३ पासूनच ही व्यवस्था सुरू केली आहे आणि आधी प्रायोगिक
तत्त्वावर असणारे कंजेशन चार्ज झोन्स आता वाढलेही आहेत.
लंडनमध्ये रस्तारुंदीकरणाला जागा
नाही, याचं कारण जुन्या इमारती. वास्तुशास्त्राचा
उत्तम नमुना असणाऱ्या या इमारतींचं ऐतिहासिक मोल लंडनकर जाणतात. म्हणूनच त्या
इमारतींना धक्का न लावता विकास केला जातो. आपल्याकडे मात्र जुन्या इमारती सर्रास
पाडून पुन्हा त्याच जागी नवी टोलेजंग
इमारती बांधली जाते. पुण्याचं वैशिष्ट्य असणाऱ्या वाडा संस्कृतीचे आता केवळ
अवशेष बघायला मिळतात. जुन्या वास्तू संवर्धनाची कला आत्मसात करून लंडनकर मात्र
त्यांची संस्कृती जतन करून आहेत.
व्हिक्टोरियन शैलीतल्या कितीतरी इमारती आजही सुस्थितीत उभ्या आहेत.
इमारतींचं सरासरी वय किमान १०० वर्ष तर नक्कीच आहे. फक्त अमीर –उमराव किंवा राजे-रजवाड्यांचेच महाल नाहीत, तर
सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या इमारती तशाच ठेवल्या
आहेत. बाहेरून बघताना जुन्या वाटणाऱ्या या
इमारती आतून अत्याधुनिक सुखसुविधांनी सज्ज असतात.
अस्सल लंडनकराला त्यांच्या शहराचा, तिथल्या जु्न्या इमारतींचा, कलेच्या
संस्कृतीचा आणि एकूणच इतिहासाचा विलक्षण अभिमान. आपल्या पुणेकरांकडेही हा जाज्वल्य
अभिमान असतो, हे मान्य. पण आपला अभिमान केवळ ऐतिहासिक
वैभवाचे गोडवे गातानाच संपतो. उरलं सुरलं वैभव तरी जपण्यासाठी आपण काय करतो? सामान्य पुणेकर सांस्कृतिक- ऐतिहासिक वारसा जपण्याची आस्था दाखवत नाही, तिथे प्रशासन काय करणार ! पुण्याचं वैशिष्ट्य
तिथल्या संस्कृतीमध्ये आहे, आणि तीच आता हरवत चाललीय.
संस्कृती जपणाऱ्या जुन्या लंडनमधून फिरताना ही खंत कायम सलत राहतेय.
all the best...good start....
ReplyDeleteलेख आवडले, छान
ReplyDelete